श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे यांचा वाढदिवस, आणि “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत विशेष ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी निगडित प्रेरणादायी ग्रंथ ठेवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विवेकानंद यांच्या विचारांचे जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले.
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सामूहिक ग्रंथदानाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थिनींना प्रेरणादायी व विचारप्रवर्तक ग्रंथ भेट देऊन वाचनाची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले गेले.
याचबरोबर, सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी फळवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक दायित्वाची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमास विद्यार्थिनींसह शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांमुळे वाचनसंस्कार, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला.




